सार्वजनिक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष
पुणे – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. दोन्ही लाटांच्या अनुभवानंतरही अनेक पुणेकरांकडून मास्कच्या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे.
करोनाचे “सुपरस्प्रेडर’ ठरू शकणारे शासकीय यंत्रणांतील कर्मचारी, व्यावसायिक आदी मास्कच्या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. विना मास्क वावरल्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते.
प्रादुर्भावाच्या रोखण्यासाठी प्रामुख्याने नाकावर मास्क असणे गरजेचे असते. मात्र अनेक जण गळ्यात, हनुवटीवर मास्क लावत असल्याचे चित्र शहरात आहे.
शहरातील बस स्टॉप, रेल्वे स्थानक, स्वारगेट बस स्थानक, तुळशीबाग, मंडई, मार्केटयार्ड या गर्दीच्या ठिकाणांसह पीएमपीच्या बसेस, मंदिरे, भाजी मंडई या ठिकाणी मास्ककडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.