मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.
देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली.
दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केले आहे. तर काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना आहे असं म्हणत भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला.