पुणे – जिल्ह्यातील करोना बाधित संख्या झपाट्याने वाढली आणि अवघ्या पंधरा दिवसात ग्रामीणमधील 7 वर असलेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या 30 वर गेली आहे. ही हॉटस्पॉट गावे ही शहरालगत असलेल्या तालुक्यांतील आहे. त्यामध्ये हवेली-11 तर मुळशी तालुक्यात 8 हॉटस्पॉट गावांची संख्या आहे.
पुणे शहरासह राज्यात करोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बाधित सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ग्रामीणमधील संख्या कमी आहे. मात्र, नागरिकांनी करोनाचे नियम पाळले नाही तर ही संख्या वाढायला वेळ लागणार नाही. दरम्यान, हवेली तालुक्यातील निम्मी गावे ही शहर हद्दीत येतात. तर मुळशी आणि मावळ हे तालुकेही शहरालगत आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यातील बाधित अधिक सापडत असल्याने हॉटस्पॉट संख्याही वाढली आहे. ग्रामीणमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 465 हॉटस्पॉट गावे ठरली. त्यानंतर हळूहळू त्यामध्ये घट झाली.
नोव्हेंबर 2021 अखेर ही संख्या तब्बल 8 पर्यंत खाली आली. डिसेंबर महिन्यात ही संख्या एकने घटली. हवेली तालुक्यात 11, मुळशी 8, मावळ आणि जुन्नर प्रत्येकी 4, आंबेगाव 2 तर खेड तालुक्यात 1 गावांचा समावेश आहे.