बार्शी – शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या माध्यामातून वर्षात दामदुपटीसह अनेक आश्वासनांचा पाऊस पाडत गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपयांचा चुना लावून महाठक विशाल फटे फरार झाला. सध्या त्याच्या विरोधात पाच कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असला तरी ही रक्कम दोनशे कोटीच्या घरात असल्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे.
यात अनेक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही गुंतवणूक केल्याचे बोलले जाते. या प्रकरणी बार्शीचा महाठक विशाल फटे, त्याचे वडील अंबादास आई अलका, भाऊ वैभव आणि पत्नी राधिका यांच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या महाघोटाळ्याचा सुत्रधार विशालहा दुबईला पत्नी राधिका व दीड वर्षीच्या मुलीसह पळून गेल्याचे खात्रीलायक रित्या समजते.
पोलिसांनी विशाल फटे व त्याच्या वित्तीय संस्थांशी निगडीत पाच बॅंक खाती गोठवली असून उपळाई रोडवरीस फटेचे बंद कार्यालयाची चिडलेल्या गुंतवणुक दारांनी फोड तोड करत कासारवाडी रोडवरील फटेच्या बांधकामाचे साहित्य ही नेले आहे. बार्शी शहर पोलिसात फिर्यादी दीपक अंबारे ( वय 37 रा. शेळके प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.
बार्शीच्या बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे प्राध्यापक अंबादास फटे यांचा मुलगा विशालचे येथील शिवाजी कॉलेज रस्त्यावर नेट कॅफे होते. दीपक यांची पीकविम्यासंदर्भात विशालशी ओळख झाली, त्यातून त्यांच्यात मैत्री झाली. त्यावेळी अलका शेअर्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून विशाल शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करत असे. त्यातून त्याला फायदा पाहून दीपकने प्रथम 70 हजार रुपये गुंतविले होते.त्यावर एका महिन्यात दोनवेळा मिळून 70 हजार रुपये लाभ दिला.
त्यामुळे दीपकचा त्याचेवर विश्वास बसला. विशालने शेअर्स मार्केटमध्ये रक्कम गुंतवणूक करण्याकरिता विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड, अलका शेअर्स सर्विसेस, जे. एम. फायनान्शीअल सर्व्हिसेस या कंपन्या काढल्या. या कंपनीमध्ये विशालचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव तसेच आई अलकायांच्या नावे विशालने त्या कंपन्या सुरू केल्या. नागरिकांकडून शेअर्स मार्केट मध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठया रकमा त्याच्या या कंपन्यांचे खात्यांमध्ये घेत असे. त्यासाठी गुंतवणूकदारांना विशाल आकर्षक परताव्याचे आमिष दाखवित असे. कोणाला रोख रक्कम द्यायची असल्यास फिर्यादी दीपकच्या एच.डी.एफ.सी. बॅंकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करत असे, ती काढून त्यास ऑफिसला नेऊन देत होता.
विशालने दीपकच्या नावावर डी मॅट अकाऊंट मार्फत एकही व्यवहार केला नाही. दीपकला देखील तुझे पैसे दे मी तुला जास्त फायदा मिळवून देतो. तसेच तुझे पैसे शेअर्स मार्केट मध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करुन तुला जास्त नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून दीपकला त्याच्या वरील वित्तीय कंपनीमध्ये दीपक व त्याच्या पाहुण्यांची रक्कम गुंतवण्यास विश्वासाने भाग पाडले. विशाल फटे हा गुंतवणूकदारांची रक्कम ही शेअर्स मार्केट मधील आय.पी.ओ. ग्रे मार्केट मध्ये गुंतवणूक केल्याचे सांगत असे. आय.पी.ओ. महिन्यातून 2 ते 3 वेळा असते. त्यामध्ये 15 ते 20 टक्के नफा होत असतो. त्यामुळे महिन्यास गुंतवलेल्या रक्कमेवर अंदाजे 30 ते 35 टक्के नफा मिळत असल्याची अल्गो ट्रेडींग ही नवीन संकल्पना दीपक अंबरेसह नातेवाईकांना तसेच मित्रांना व बार्शी शहरातील व परिसरातील इतर लोकांना ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.
दीपकने स्वत:चे, सख्या भावाचे व नातेवाईकाकडून हात उसने पैसे घेतले. विशाल फटे याच्या वरील नमूद 3 कंपन्याच्या खात्यामध्ये, तसेच त्याच्या वैयक्तीक नावाच्या बचत खात्यामध्ये त्या रक्कमा जमा केल्या होत्या. विशाल फटे यास दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी झी हिंदुस्थान यांचेवतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे हस्ते बेस्ट टेक्नलजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडींग इन इंडिया म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे बऱ्याच लोकांनी कोटयावधी रुपयांची रक्कम विशाल फटे यांनी तयार केलेल्या वरील कंपनीमध्ये विश्वासाने गुंतवणूक केली होती.
तसेच जे.एम. फायनान्स सर्विसेस नावाची कंपनी तयार करुन त्याचे बनावट कागदपत्रे तयार करुन ते एच.डी.एफ.सी. पुणे या बंकेत त्या कंपनीचे अकाऊंट काढले. त्या अकाऊंटवर जे.एम. फायनान्स नावावर पैसे भरण्यास गुंतवणूकदारांना सांगितले होते. त्या अकाऊंटवरही गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात गुंतवणूक केली होती.