नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्याला लाटेनंतर रिऍटी क्षेत्रातील परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येत आहे. घरांचे बांधकाम वाढत असून ग्राहकाकडून खरेदीही वाढली आहे. त्यामुळे हे क्षेत्र पूर्णपणे 2022 मध्ये पूर्वपदावर येईल. या क्षेत्रातील घडामोडींमुळे पुढील वर्षात घरांचे दर 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
या अहवालाबाबत या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्रातील परिस्थिती 2022 मध्ये पूर्णपणे पूर्वपदावर येईल. करोनाच्या काळात विकासकांची आणि ग्राहकांची बरीच धांदल उडाली होती. आता या संदर्भात कमी-अधिक प्रमाणात काही बातम्या येतात. मात्र त्याचा या क्षेत्रावर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 2022 मध्ये या क्षेत्रातील उलाढाल वेगाने वाढेल आणि अस्थिरता कमी होईल.
अहवालातील दाव्याप्रमाणे 2020 मध्ये 1.32 लाख घरे विकली गेली. 2014 मध्ये घरांची विक्री सर्वात जास्त झाली होती. त्या संख्येपेक्षा ही संख्या 60 टक्क्यांनी कमी होती. मात्र आता यापेक्षा घरांची विक्री कमी होणार नाही आणि 2021 ची आकडेवारी लवकरच बाहेर येईल.
जानेवारी ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 1.45 लाख घरांची विक्री झाली आहे. 2020 मधील या कालावधीतील आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी पाच टक्क्यांनी जास्त आहे. प्राप्त संकेतानुसार 2022 मध्ये घरांची विक्री आणि निर्मिती 2019 वर्षा इतकी होण्याची शक्यता आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये एकूण महागाई वाढत आहे.
घरासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे घरांचे दर पुढील वर्षी पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकतात. नोटबंदी, रेरा, जीएसटी या कारणामुळे बडे विकसक या क्षेत्रामध्ये उतरत आहेत. या क्षेत्रातील काळा पैसा कमी होण्यास मदत होत आहे असा दावा त्यांनी केला.