विवेक रंजन अग्निहोत्रीच्या “काश्मीर फाइल्स’ची खूप चर्चा सुरू आहे. या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. हा सिनेमा जगभर रिलीज होण्याच्या एक महिनाभर अगोदरपासून अमेरिकेत हे पोस्टर रिलीज करण्यात आले.
विवेक अग्निहोत्रीच्या “ताश्कंद फाइल्स’चे खूप कौतुक झाले होते. त्या सिनेमाला या वर्षाच्या प्रारंभी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आता विवेक अग्निहोत्रीचा “काश्मीर फाइल्स’ पुढच्या वर्षी 26 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
काश्मीरमधील पंडितांच्या हत्याकांडांचा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या पीडितांच्या मुलाखतींवर हा माहितीपट आधारलेला असणार आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम “काश्मीर फाइल्स’मधून केले जाणार आहे. मोशन पोस्टरमध्ये “काश्मीर फाइल्स’मधील प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते अनुपम खेर दिसत आहेत.
अनुपम खेर या सिनेमात पुष्करनाथ पंडित नावाच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची भूमिका करत आहेत. 1990 मध्ये मुलगा, सून व दोन नातवंडासह श्रीनगरमधून रातोरात हद्दपार व्हावे लागल्याची व्यथा ते मांडतील.
=========================