नवी दिल्ली – प्रो-कबड्डी लीग स्पर्धा येत्या बुधवारपासून सुरू होत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा या स्पर्धेत 12 संघ सहभागी होत असून, सर्व सामने बेंगळुरूला होणार आहेत. मात्र, यावेळीही हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.
प्रो-कबड्डी लीगचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवर होणार आहे. डिस्ने प्लस आणि हॉटस्टार या ऍपवरही सामन्यांचे प्रक्षेपण पाहता येणार आहे. प्रो-कबड्डी लीगमध्ये रोज तिन सामने खेळवले जातील. मात्र, तिनही सामन्यांची वेळ भिन्न राहणार आहे.
पहिला सामना सायंकाळी 7:30 वाजता, दुसरा सामना 8:30 वाजता आणि तिसरा सामना रात्री 9:30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या दिवशीबेंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा, तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास आणि बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात सामने होतील.
त्यामुळे या सर्व संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. ही स्पर्धा 20 जानेवारीपर्यंत खेळवली जाणार आहे.