मुंबई – काही सहकारी संस्था आपल्या नावापुढे बॅंक असा शब्द वापरत आहेत. त्याचबरोबर आपले सदस्य नसलेल्या लोकांकडून ठेवी स्वीकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. अशा प्रकारापासून नागरिकांनी सावध राहावे अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने जारी केली आहे.
बॅंकिंग नियमन कायदा 1949 मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून ही दुरुस्ती 29 सप्टेंबर 2020 पासून अंमलात आली आहे. त्यानुसार सहकारी संस्थांना बॅंक, बॅंकर किंवा बॅंकिंग असा शब्द वापरता येणार नाही. या कायद्याचा भंग करून काही सहकारी संस्था त्यांच्या नावात बॅंक शब्दाचा समावेश करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचबरोबर काही संस्था आपले सदस्य नसलेल्या लोकांकडून ठेवी स्वीकारत आहेत. हा बॅंकिंग कायद्याचा भंग आहे. अशा सहकारी संस्थांना रिझर्व्ह बॅंकेने बॅंकिंगचा परवाना दिलेला नाही. त्यामुळे त्यांना बॅंकिंग कायद्याअंतर्गत बॅंकिंग व्यवहार करता येणार नाहीत.
बॅंकांमधील ठेवीला क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन कडून काही प्रमाणात विमा लागू केलेला असतो. अशा प्रकारची तरतूद सहकारी संस्थांमधील ठेवीला लागू होत नाही. सहकारी संस्थांनी बॅंकिंग संदर्भातील व्यवहार केल्यास ग्राहकांनी त्यासंदर्भात योग्य चौकशी करून निर्णय घ्यावा असे रिझर्व्ह बॅंकेने सुचविले आहे.