आळंदी – भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. तसेच 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन- पांढरी काठी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ग्रंथपुजन तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी व सुनिता गिरी यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संघर्षमय जीवनाविषयी माहिती देत त्यांच्याकडे असणाऱ्या पुस्तक रुपी संपत्ती तसेच त्यांनी क्षेपणास्त्र बनवून भारताची जागतिक पातळीवर ओळख करून दिली. दिवसातील 22 तास अभ्यास करून त्यांनी स्वतःला घडविले आणि त्यातून भारत देशाच्या प्रगतीला उंचावर नेले. माणसाला येणारे माणूस पण वाचनातून येते व पुस्तक वाचल्याने व्यक्तीला चांगल्या-वाईट याचे ज्ञान होते. त्याचबरोबर पांढरी काठी दिनाचे महत्व, वैशिष्ट्य, गरज तसेच दिव्यांग व्यक्तीला मदत करणारे हात हे सुंदर असतात असे सांगितले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, क्रीडा समिती प्रमुख श्रीरंग पवार, दिव्यांग विभागाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ वहिले यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली घोलप यांनी केले व उपस्थितांचे आभार मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले.