पुणे – कॉपीराइटच्या नावाखाली खंडणी उकळण्यासाख्या प्रकार पाठिशी न घालता, त्यासंबंधी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हॉटेल्स व्यावसायिकांना दिल्या. याबाबतची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
पंचतारांकित हॉटेल्समध्ये घडणाऱ्या या घटनांची पोलीस आयुक्त गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. त्यानंतर फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) व नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपन्यांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार पंचतारांकित हॉटेल्समध्ये घडत असतानाही हॉटेल्स प्रशासनाकडून मात्र त्याबाबत कुठलीही कारवाई केली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी आयुक्तालयात हॉटेल्स व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पूना हॉटेलिअर्स असोसिएशनच्या 14 पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोरेगाव पार्क ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यावेळी उपस्थित होते. तर पूना हॉटेलिअर असोसिएशनचे अध्यक्ष शरण शेट्टी आणि विक्रम शेट्टी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये हॉटेल्स व्यावसायिकांनी लग्न सोहळा किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्यावेळी आयोजकांना त्रास होईल, अशा प्रकारांना थारा देऊ नये, केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, कॉपीराईटच्या नावाखालील खंडणी उकळण्यासाख्या गैरप्रकारांना पाठीशी घालू नये, पोलिसांना त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी, गैरप्रकार घडत असल्यास हॉटेल्स व्यावसायिकांनी स्वतः तक्रार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, पोलिसांकडून सहकार्य केले जाईल तसेच हॉटेल्स व्यावसायिकांच्या काही तक्रारी असल्यास त्याही मांडाव्यात, अशा सुचना पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिल्या. त्यास हॉटेल्स व्यावसायिकांनी सहमती दर्शविली.