नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांतील लष्करी पातळीवरील चर्चेची 13 वी फेरी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सध्या चीनने लडाखच्या सीमावर्ती भागात आपली लष्करी ताकद वाढवल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला अधिक महत्त्व आहे.
या बैठकीची पूर्व तयारी म्हणून दोन्ही देशांच्या लष्करांनी आपआपले मुद्दे एकमेकांना सादर केले आहेत. त्यानंतर येत्या दोन तीन दिवसांत बैठकीची तारीख निश्चित केली जाणार आहे. ही कमांडर पातळीवरची बैठक आहे.
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख नरवणे यांनी लडाखच्या पर्वतीय भागाची दोन दिवसांची पहाणी करून तेथील ग्राऊंड स्थितीचा आढावा घेतला आहे. बैठकीच्या समारोप प्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मी नेहमीच या भागाचा दौरा करून व्यक्तिश: ही माहिती घेत असतो.
आपले तेथील लष्कर जय्यत तयारीत आहे त्यामुळे तेथील स्थिती बाबत मी समाधानी आहे असे त्यांनी म्हटले आहे.