नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात ‘लॉकडाऊन’ बाबत निर्णय घेणार – अजित पवार

पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ बाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देऊन कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी नियम कडक पाळावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री संजय जगताप, दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, अतुल बेनके, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजन युक्त बेड आदी आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांना त्रास होवू नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे सांगून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी सीओईपी जम्बो हॉस्पिटल मधील बेडची संख्या आवश्यकतेनुसार 800 पर्यंत वाढवून हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु करा. पिंपरी चिंचवड मधील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करा. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याची कार्यवाही करा, असे सांगून ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे 316 वरुन 600 पर्यंत वाढवण्यात येतील. यासाठी आवश्यक त्या प्रमाणात लस उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दहावी, बारावी व एमपीएससीच्या परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार होतील. तथापि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येत आहेत. इयत्ता दहावी व बारावी वगळून शाळा, महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येतील.

लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत व अंत्यसंस्कार 20 व्यक्तींच्या उपस्थितीतच करण्यात यावेत. सार्वजनिक, राजकीय, खाजगी कार्यक्रमांना बंदी राहील, यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी सुरु राहतील. येत्या काळात येणारे होळी व अन्य सण समारंभ घरगुती स्वरुपात साजरे करुन नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, पुरेसे बेड उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढवायला हवा.

जिल्ह्यात लग्न समारंभ कमीत कमी संख्येत व्हावेत, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, निर्बंधांची कडक अंमलबजावणी व्हावी, आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करावी, बेड व्यवस्थापन सुरळीत ठेवावे, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.

डॉ.डी.बी.कदम यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गृह विलगिकरण, ऑक्सिजन युक्त बेडवरील रुग्ण, उपलब्ध बेड यांसह ग्रामीण भागातील कोविड-19 सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

बैठकीस यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी. बी.कदम, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.