पुणे – शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून धनकवडीतील श्रीनगर सोसायटीतील एका घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटीतील तीन लाखांची रोकड आणि दागिने असा तीन लाख नव्वद हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.
याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि कुटुंबीय धनकवडीतील श्रीनगर सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास महिला घर बंद करून कामानिमित्त बाहेर पडली. चोरट्यांनी दरवाज्याचे कुलुप तोडले. कपाटातील तीन लाखांची रोकड आणि दागिने असा तीन लाख ९० हजारांचा ऐवज लांबविला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महिला कामावरून घरी परतली. तेव्हा दरवाज्याचे कुलुप उचकटल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे तपास करत आहेत.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांचे घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ५३ लाखांचे दागिने लांबविल्याची घटना येरवड्यातील संगमवाडी भागात घडली होती. शहरात घरफोडी करणाºया चोरट्यांनी उच्छाद मांडला असून भरदिवसा बंद सदनिकांचे कुलुप तोडून ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.