टोकियो – निकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी या आधीच्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. नीरज चोप्रा याने भालाफेक क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मैदानी स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक मिळालं. तो आनंद कायम असतानाच आता टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशवासियांची मान उंचवणारी कामगिरी भालाफेकपटू सुमित अंतिलने केली आहे.
सुमित अंतिलने विश्वविक्रमासह भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. भालाफेकच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.8 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर सुमितने पाचव्या प्रयत्नात आणखी सुधारणा करत 68.55 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम केला.
सुमितने पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर अंतरावरून भाला फेकला, जो एक विक्रम देखील आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 65.27 मीटर, चौथ्या प्रयत्नात 66.71 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटर भाला फेकला.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी महिला नेमबाज अवनी लखेरा हिने सोमवारी सकाळी सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत सुमारे 7 पदके जिंकली आहेत, यामध्ये 2 सुवर्णपदके आहेत.