नगर -महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी विनायकराव देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाचे महासचिव खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी काल नवीदिल्ली येथील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयातून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.
नव्या कार्यकारिणीत राज्यातून उपाध्यक्षपदी 18, सरचिटणीस पदी 65 तर सचिवपदी 104 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली.याशिवाय 6 जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा प्रदेश सरचिटणीसच्या पदावर नियुक्ती करम्यात आली असून अशा प्रकारे सलग दुसऱ्यांदा नियुक्ती होणारे ते एकमेव पदाधिकारी आहेत. मागील कार्यकारिणीत देशमुख व माजी आमदार नंदकुमार झावरे हे दोन सरचिटणीस होते. यावेळेच्या कार्यकारिणीत जिल्ह्यातुन केवळ विनायकराव देशमुख यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशमुख यांनी कॉंग्रेस संघटनेत प्रदिर्घ काम केले असून 1994 ते 1998 जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, 1998 ते 2002 जिल्हा सरचिटणीस, 2002 ते 2004 जिल्हा कॉंग्रेस कार्याध्यक्ष, 2004 ते 2009 जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष, 2010 ते 2014 योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष, 2016 ते आतापर्यंत प्रदेश सरचिटणीस व 26 ऑगस्ट 2021 पासून पुन्हा प्रदेश सरचिटणीस पदावंर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल देशमुख यांनी अ.भा. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहप्रभारी वायसी रेड्डी यांचे आभार मानले आहे.