जळोची, -पुणे, पनवेल, बारामती नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षकांसह वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी गोविंदबाग बारामती येथे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी बुधवारी (दि. 25) केली.
यावेळी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड, अध्यक्ष हनुमंत शिंदे, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते. पुणे, पनवेल महानगरपालिका, बारामती नगरपालिकेत 2015-16 पासून हद्दवाढ झाल्याने नवीन गावे समाविष्ट करण्यात आली. तेथील ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासकीय, महसुली कामकाज महानगरपालिका, नगरपालिका प्रशासना मार्फत सुरू आहे;
परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षकांचे वर्गीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या दि. 25 जुलै 2019 च्या शासन निर्णयामुळे वर्गीकरण प्रक्रियेस विलंब होत आहे.
तर काही ठिकाणी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमचा संदर्भ देऊन शिक्षक वर्गीकरणास असहमती दर्शवली जात आहे. त्यामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या सर्व परिस्थितीतून मार्ग निघावा याकरीता शिक्षक संघाने पवार यांना साकडे घातले आहे.
वर्गीकरणाची प्रक्रिया क्लिष्ट होईल
ग्रामविकास विभागाच्या दि. 25 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावातील शाळा वर्ग करताना जिल्ह्यातील शिक्षकांकडून विकल्प भरून घेऊन सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक वर्ग करावेत असे सूचित केले आहे.
या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्याची प्रक्रिया ढवळून निघेल, शिक्षक वर्गीकरणाची प्रक्रिया क्लिष्ट होईल.तसेच अनेक महिला व दिव्यांग शिक्षकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शासन निर्णयात दुरुस्ती होणेकरिता आपले निवेदन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे माझ्या शिफारशीसह पाठवतो असे शरद पवार यांनी सांगितले.