नाशिक – 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या पोलिसांना चकमा देऊन वैशाली पसार झाल्या होत्या . मात्र ठाणे ACB ने धडाकेबाज कारवाई करत झनकर यांना अटक केली आहे. आता त्यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे.
झनकर यांना जामीन मंजूर झाला असला तरी कोर्टाने काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. या अटी-शर्तींनुसार आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांना दर सोमवारी नाशिकच्या ACB कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. न्यायालयाने या अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणा कोर्टात सध्या खटला सुरु आहे. झनकर यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती. तसेच ठाणे लाचलुचपत विभागाने देखील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता.
संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरीता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.
27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वैशाली झनकर यांनी मान्य केले. शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाने केली होती.