अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचा आमचा निर्णय योग्यच – बायडेन

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील फियास्कोबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्या बायडेन यांच्यावर केली जाणारी टीका आता अधिक व्यापक स्वरूपात होऊ लागली असली तरी अध्यक्ष बायडेन मात्र जवळपास रोजच या निर्णयाचे ठासून समर्थन करताना दिसत आहेत. आपल्या सरकारचा हा निर्णय अत्यंत व्यवहार्य, तर्कशुद्ध आणि योग्यच होता असे त्यांनी आज पुन्हा एकदा म्हटले आहे. आपल्या निर्णयाची अमेरिकेच्या इतिहासात नोंद होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या संयुक्तराष्ट्रातील माजी प्रतिनिधी निक्की हॅले यांनी बायडेन यांच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने तेथे पूर्ण शरणांगती पत्करली आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकन नागरीकांना बाहेर काढण्या आधी त्यांनी तेथे आपले सैन्य माघारी घेतले ही एक मोठी चूक होती. त्यांच्या या टिकेच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांनी आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तालिबानला तेथे आता आपली मूलभूत भुमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

अफगाणिस्तानातील लोकांना एकत्र करून त्यांचे कल्याण ते साधणार आहेत की नाही हे पहावे लागेल. जर ते हे करणार असतील तर त्यांना आर्थिक सहाय्यासह सर्वच प्रकारची मदत लागणार आहे. त्यांना जगाचीही मान्यता मिळवावी लागणार आहे. अमेरिकसह जगातील अन्य देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तान सोडून जाऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे याकडेही बायडेन यांनी अंगुली निर्देश केला आहे.

अजून पर्यंत तरी तालिबानने तेथील अमेरिकन फौजांना इजा पोहचवलेली नाही. त्यांनी अमेरिकन नागरीकांना तेथून निघून जाण्यासाठी वाटही करून दिली आहे असेही बायडेन यांनी नमूद केले. आम्ही गेल्या 36 तासांत तेथून अकरा हजार लोकांना हलवले आहे असेही बायडेन यांनी सांगितले. तेथील प्रत्येक अमेरिकन नागरीकाला बाहेर काढणे हे आमचे सध्याचे तातडीचे लक्ष्य आहे. तेथे असलेल्या नागरीकांशी आम्ही फोन, इमेल आणि अन्य साधनांच्या मदतीने संपर्कात आहोत.

नाटो देशांच्या दुतावासातील कर्मचारी व अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना बाहेर काढण्याकडेही आम्ही लक्ष ठेऊन आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्या अफगाणि मित्रांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 14 ऑगस्ट पासून आत्तापर्यंत आम्ही तेथून तब्बल 28 हजार लोकांना बाहेर काढले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जुलैपासूनचा आकडा लक्षात घेतला तर तो 33 हजारावर जातो असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.