पुणे – बॅंकखात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला 5 लाख 25 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी 60 वर्षीय ज्येष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर बॅंक खातेचा केवासी पेडींग असल्याचा मेसेज पाठविला होता. त्यानंतर चोरट्याने त्यांना फोन करून मुंबईतील बांद्रा बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले.
केवायसी अपडेट केला नाही, तर तुमचे अकाउंट ब्लॉक करण्याची धमकी सायबर चोरट्याने दिली. त्यानुसार जेष्ठाने संबंधिताला बॅंकखात्याची ऑनलाईनरित्या माहिती दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना लिंक पाठवून 6 लाख 34 हजार रूपयांची फसवणूक केली.
ज्येष्ठाने बॅंकेसोबत पत्रव्यवहार करून 1 लाख 10 हजारांची रक्कम माघारी मिळविली. मात्र, उर्वरित 5 लाख 25 हजारांची फसवूणकीप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बडे तपास करीत आहेत.