संयुक्त राष्ट्र – जगातील अनेक देशांमध्ये हवामानात मोठे बदल झाल्यांमुळे तापमान वाढत असल्याने उष्णतेची लाट पसरली आहे. यात अमेरिका, कॅनडा यासारख्या प्रमुख देशांसह उत्तर गोलार्धातील उत्तर आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, वायव्य भारतीय उपखंड या भागातील देशांना ऐतिहासिक तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे.
येत्या काही दिवसांत तापमानवाढीचा आलेख चढाच राहील असा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
जगातील दुसरा थंड आणि बर्फाच्छादित देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनडामध्ये तापमानवाढीमुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. देशातील ब्रिटिश कोलंबिया राज्यात पाच दिवसांमध्ये तब्बल 486 जणांचा अनपेक्षितपणे मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातील अनेक जणांचा मृत्यू हा वाढत्या तापमानामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हॅंकुवर शहरात जून महिन्यात सरासरी 20 अंश सेल्सिअस असताना गेल्या आठवड्यात यात दुपटीने वाढ झाल्याचे आढळले आहे. तसेच लिटनमध्ये 29 जून रोजी सर्वाधिक म्हणजे 49 अंशांच्या वर तापमानाची नोंद झाली आहे, तर अनेक शहरांचे तापमान 45 अंशांपुढेच नोंद झाले आहे.