श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी धडक आणि महत्वपूर्ण मोहीम राबवत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या त्या चकमकीत मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य होते. दरम्यान, संबंधित चकमकीत भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले.
पुलवामामधील एका गावात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणाला सुरक्षा जवानांनी वेढले. त्यांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
त्यामध्ये एक जवान जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारावेळी जखमी जवानाची प्राणज्योत मालवली. दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला जवानांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली.
दहशतवाद्यांना टिपण्यासाठी अतिरिक्त सुरक्षाबळ चकमकस्थळी दाखल झाले. सुरक्षा जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच दहशतवाद्यांना ठार केले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानीही असल्याचे समजते.
एकाच वेळी पाच दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांत तीन चकमकी झडल्या. त्यामध्ये मिळून सुरक्षा दलांनी दहा दहशतवाद्यांना ठार केले.