वॉशिंग्टन – गेल्या दीड वर्षांचा कालावधीत जगाला संत्रस्त करणाऱ्या करोना महामारीचा फटका लहान मुलांनाही बसला असून लहान मुलांमधील स्थूलत्वाचे प्रमाण गेल्या काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा निष्कर्ष आता समोर आला आहे.
अमेरिकेसारख्या देशात गेल्या चाळीस वर्षांच्या कालावधीत मुळातच लहान मुलांमधील स्थूलपणा वाढत चालल्याची चिंता असतानाच आता करोना महामारीच्या कालावधीमध्ये हा स्थूलपणा 2% ने जास्त वाढल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी ओबीसीटी जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले असून मुलांमधील हा स्थूलपणा चिंतेची बाब असल्याचेही म्हटले आहे. या वयात स्थूलपणा आल्याने रक्तदाब, मधुमेह आणि यकृताबाबतचे विकार या मुलांना सतावू शकतात असा इशाराही या जर्नलमध्ये देण्यात आला आहे.
फिलाडेल्फिया येथील हॉस्पिटल मध्ये दोन वर्षे ते 17 वर्षे या वयोगटातील पाच लाख लहान मुलांच्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जानेवारी 20 ते डिसेंबर 20 या कालावधीमध्ये अमेरिकेतील लहान मुलांच्या जाडेपणामध्ये दोन टक्क्याने वाढ झाली असून एकूण प्रमाण 15.4 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
कृष्णवर्णीय परिवार लॅटिन परिवार आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांमध्ये लहान मुलांमधील स्थूलत्व वाढण्याचा धोका अधिक असल्याचेही या निष्कर्षात समोर आले आहे. गेला दीड वर्षांच्या कालावधीमध्ये शालेय शिक्षण बंद असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. शाळेत असताना विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीवर बंधने असतात.
घरात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यावर कोणती बंधने राहात नसल्याने त्यांचे स्थूलत्व वाढत असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. शाळेत ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना व्यायाम करावा लागतो त्या प्रकारचा कोणताही व्यायाम लहान मुले घरी करत नसल्याने त्याचाही फटका त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला बसत असून त्यांचा स्थूलपणा वाढत चालला आहे.