- नवीन 242 रुग्णांची नोंद
- 173 रुग्ण बरे
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात तब्बल तीन महिन्यानंतर करोना मृत्यूला ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासांत शहरात करोनाने एकही रुग्ण दगावला नाही. गेल्या 24 तासांत एका मृत्यूची नोंद झाली असून हा मृत्यू देखील पूर्वीचा असून त्याची शनिवारी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. मृत्यूला ब्रेक लागला असला तरी शहरातील बाधितांची संख्या कायम आहे. आज शहरात 242 जणांना करोनाची लागण झाली. तर 173 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 26) शहरात 242 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 56 हजार 697 जणांना करोनाची लागण झाली आहे. पूर्वी झालेल्या एका मृत्यूची शनिवारी नोंद करण्यात आल्याने आजपर्यंतच्या शहरातील 4274 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 173 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 51 हजार 117 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4917 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 932 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 374 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1306 इतकी आहे.