- पॉझिटिव्हीटी दर पाचपेक्षा अधिक
- निर्बंधांमध्ये वाढ
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर अद्यापही पाचपेक्षा अधिक आहे. शहरात दररोज चार ते साडेचार हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहे. त्यापैकी सरासरी 200 ते 250 बाधित आढळत आहेत. डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे तसेच राज्यातील वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे राज्य शासनाने निर्बंधामध्ये वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पिंपरी चिंचवड शहारातही निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरावली असली तरी अद्याप संसर्गदर अधिक आहे. पॉझिटिव्हीटी दर पाचपेक्षा अधिक असल्याने शहर अद्याप तिसऱ्या टप्प्यातच आहे. गेल्या आठ दिवसांच्या सुरूवातीला पॉझिटिव्हीटी दर काहीसा कमी झाला होता. मात्र तीन दिवसांपासून पुन्हा संसर्गदर 5 पेक्षा अधिक आहे. 17 जून रोजी संसर्गदर 4.52 टक्के होता. हा दर वाढून 20 जून रोजी 6.72 टक्के इतका झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जून रोजी हा दर पुन्हा कमी होत 3.80 टक्के इतका झाला. मात्र त्यानंतर सातत्याने 5 टक्यांहून अधिक ससंर्ग दर आहे. 25 जून रोजी हा संसर्ग दर 5.24 टक्के इतका होता. सातत्याने संसर्ग दरामध्ये चढ-उतार होत आहे. तसेच अजूनही दर आठ दिवसांचा पॉझिटिव्हीटी दर हा पाचपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहरातील नागिरकांनी करोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच जे नागरिक लसीसाठी पात्र आहेत, त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
रावेत, किवळे, चिंचवड परिसरात आज सर्वाधिक रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरात आज रावेत, किवळे, मामुर्डी व चिंचवड या परिसरात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. हा ब प्रभाग असून याठिकाणी आज दिवसभरात 49 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ब प्रभाग असलेल्या तळवडे, रुपीनगर याठिकाणी 39, भोसरी, दिघी, चऱ्होली (इ प्रभाग) 37, मोशी, चिखली, खराळवाडी ( क) 32, वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर पिंपळे गुरव (ड) 32 रुग्ण आढळले आहेत. तसेच अ व ग प्रभागात 19 तर ह प्रभागात सर्वात कमी 15 रुग्ण आढळले आहेत.