नवी दिल्ली – जगभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तेथील नागरिक टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काही देशांनी लस घेणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्यास सुरुवात केली आहे. तर आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये नागरिकांनी लस घ्यावी यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अनेक लोक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येथील पंजाब सरकारने करोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या लोकांचं सीम कार्ड बंद करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भातील निर्णय पंजाब प्रांतातील आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशिद यांनी घेतला आहे.
अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी, असाच येथील सरकारचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री राशिद म्हणाले की, लसीकरण केल्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असं असताना राज्याने लसीकरणाचं लक्ष्य गाठलं नसल्याचं समोर आल आहे. लसीचा पहिला डोस घेणारे तीन ते चार लाख लोक अद्याप दुसऱ्या डोससाठी आले नाहीत, असंही म्हणाले.
पाकिस्तानात २ फेब्रुवारीपासून करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ज्या लोकांनी करोना लसीसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांना सुरुवातीला इशारा देण्यात येईल. जेणेकरून ते नोंदणी करू शकतील. इशारा दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्यास ओळखपत्रावर नोंद असलेले सीमकार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर सीम कार्ड पुन्हा सुरू करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.