पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत असलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना मोफत घरे देण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे 83 कर्मचाऱ्यांचे वारस मोफत घरांसाठी पात्र ठरत आहेत. महापालिकेच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या घरांपैकी 83 घऱे सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतील 25 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास महापालिकेच्या काही योजनांचा त्यांच्या वारसांना लाभ देता येतो. अशा कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे देण्यासाठी नगरसविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने शासन निर्णय पारित करण्यात आला होता. त्यानुसार, 269 चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिका वाटपाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी मागणी सफाई कर्मचारी करत होते. त्यासाठी सफाई कर्मचारी वारंवार पाठपुरावा करत होते. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी व त्यांच्या हक्काच्या घरांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.