- 253 करोनामुक्त
- 11 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आली आहे. आज 253 करोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नवीन 172 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच 11 बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 18) शहरात 172 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 54 हजार 910 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 11 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 6 व शहराबाहेरील 5 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील 4245 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 253 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 49 हजार 470 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5418 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 969 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 226 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1195 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात 9 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 18) 9 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले. बाधित रुग्ण हे वाकड, औंध, पिंपळे निलख या परिसरातील आहेत. त्यामध्ये 6 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. करोनामुक्त रुग्णांमध्ये पिंपळे गुरव आणि हिंजवडी-मारुंजी येथील दोघांचा समावेश आहे. त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला रुग्ण आहे. रुग्णालयात सध्या 15 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 732 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 352 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 355 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
निर्बंध शिथिल होताच मावळात करोना रुग्णसंख्येत वाढ
मावळ तालुक्यात करोनाबाबतचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु सध्या दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. तर करोनामुक्त रुग्णांची संख्या कमी होत आहे. मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. 18) 97 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यात दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरी भागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील 15 दिवसांत 5 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 488 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 628 आहे. शहरी भागात 50 तर ग्रामीण भागात 47 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत 35 रुग्ण सापडले आहेत. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 13 रुग्ण सापडले, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले. तालुक्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,126 इतकी आहे. तर दिवसभरात 53 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.
शुक्रवारी आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 8, तळेगाव दाभाडे ग्रामीण 7, वराळे व बेलज प्रत्येकी 3, चांदखेड, साळुंब्रे, घोणशेत व मंगरूळ प्रत्येकी 2, नायगाव, पाटण, ब्राम्हणवाडी करंजगाव, आंबी, बोरज, जांभूळ, कान्हे, टाकवे बुद्रुक, वेल्होवळी, नवलाख उंब्रे, कोथुर्णे, राजपुरी, किवळे, भोयरे, काल्हाट, शिलाटणे, नागाथली व वडगाव प्रत्येकी 1 असे एकूण 47 रुग्ण सापडले आहेत.