पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील स्टाफ नर्संनी कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. जोरदार घोषणा देत आज (मंगळवारी) हाताला काळ्या फिती बांधून स्टाफ नर्सनी वायसीएमसमोर प्रशासनाच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.15) निदर्शने केली.
गेल्या 12 वर्षांपासून परिचारिका वायसीएममध्ये मानधनावर कार्यरत आहेत. त्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधा आणि इतर आर्थिक लाभ दिले जात नाहीत. या परिचारिकांना महापालिकेच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने महासभेमध्ये ठराव केले. त्याला महापौर उषा ढोरे यांनी मान्यता दिली. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप त्यांना महापालिका सेवेते सामावून घेण्यात आले नाही. करोनामध्ये या परिचारिकांनी रात्रंदिवस रुग्णांची सेवा केलेली असतानाही त्यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
आमदार लांडगे यांची मध्यस्थी
परिचारिकांनी आंदोलन सुरु केल्यानंतर आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे वायसीएमला पोहचले. परिचारिकांसोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्या संदर्भात आश्वासन दिले. परिचारिकांना महिन्याच्या सुट्या देणे, प्रत्येक 3 महिन्याला 10 हजार रुपये भत्ता चालू होता तो त्वरित मिळावा. यासाठी निश्चितपणे यशस्वी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी परिचारिकांना दिले. त्यांनतर परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले आणि रुग्णालयाचे कामकाज सुरळीत झाले.