वाघोली – पुणे-नगर महामार्गावर गाडीला कट मारल्याचा बहाणा करून साडे तेरा लाख रुपये चोरून पसार झालेल्या वाघोली परिसरातील टोळीवर गुन्हे शाखा युनिट ६ च्या अहवालानुसार पुणे पोलिसांच्या वतीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थापन झालेल्या युनिट ६ स्थापनेनंतर पहिलीच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
एक महिन्यापूर्वी पुणे-नगर महामार्गावर वाघोलीतील उबाळेनगर परिसरामध्ये टेम्पो चालकाला कट मारल्याच्या बहाण्याने अडवून त्याच्याकडील साडे तेरा लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी इशाप्पा उर्फ विशाल पंदी, प्रदिप उर्फ बाबू कोंढाळकर, ओंकार गुंजाळ, गणेश काळे, विजय राठोड यांना अटक केली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीप्रमुख ओंकार गुंजाळ याच्या नेतृत्वाखाली दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई होण्यासाठी युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव सदर केला. अप्पर पोलीस आयुक्त अशोर मोराळे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.