दुय्यम निबंधकांवर कारवाईची “टांगती तलवार’
पुणे – शहरात अनधिकृत बांधकामांची तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली. पुणे शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील मागील तीन वर्षांत नोंदविलेल्या सुमारे तीन लाख दस्तांची तपासणी सुरु आहे.
या तपासणीचे काम पूर्ण झाले असून यामध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असल्याची माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.त्यामुळे बेकायदेशीरपणे दस्तांच्या नोंदणी केल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरातील एका दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्यपणे जमिनींची तसेच सदनिकांची दस्त नोंदणी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबधित दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची तक्रार मंत्रालयापर्यंत पोहोचल्यावर महसुल विभागाने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील मागील तीन वर्षातील दस्तांची तपासणी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तपासणी पथके स्थापन केली आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जाऊन दस्तांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांची नोंदणी करतेवेळी दस्तामध्ये रेरा क्रमांक नमुद आहे का.
बांधकाम प्रकल्पाला मंजुरी आहे का, याचसह जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे का, याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर याचा अहवाल नोंदणी विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. आता राज्य शासन यामध्ये आढळलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण…
राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच संबधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करुन रेरा क्रमांक दस्तामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा स्पष्ट सूचना असतानासुध्दा दुय्यम निबंधकांनी बेजाबदारपणे रेरा क्रमांक नसलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील दस्तांची नोंदणी केली.
जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असतानासुध्दा एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दुय्यम निबंधकांचे हे कारनामे खुद्द महसुल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.