लखनऊ : करोना महामारीच्या कालावधीमध्ये अनेक चित्रविचित्र गोष्टी समोर येत आहेत. त्यातही देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील अनेक विचित्र गोष्टी घडत आहेत. अशीच एक विचित्र आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना कबीरनगर या गावात घडली. करोनाची बाधा झाल्यामुळे मरण पावलेल्या पित्याच्या मृतदेहस शिवण्यासही त्याच्या मुलांनी नकार दिल्याने अखेर जेसीबीच्या यंत्राने हा मृतदेह उचलून त्याच्यावर एका खड्डयात अंत्यसंस्कार करावे लागले.
ज्या पित्याचा हात पकडून या मुलांनी चालायला शिकले होते, त्याच पित्यावर अशाप्रकारे बेवारसपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. राम ललित असे या माणसाचे नाव असून त्याला तीन मुले आहेत. करोनाची बाधा झाल्यावर मुलांनी राम ललीतला एका रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती न सुधारल्याने डॉक्टरांनी त्याला घरी पाठवले होते.
घरी आल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने राम ललितचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा कोणीही या मृतदेहाला हात लावायला तयार नव्हते. सख्ख्या मुलांनीही त्यावर अंत्यसंस्कार करण्याएवजी जेसीबीचे यंत्र बोलवून एक मोठा खड्डा खणला आणि जेसीबीने तो मृतदेह उचलून त्या खड्ड्यात पुरून टाकला.
राम ललीतची मुले अशाप्रकारे व्यवहार करत असताना गावातील कुणीही पुढे येऊन त्याला आक्षेप घेतला नाही. गावातील सरपंच श्रलयोगानंद गौतम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या मुलांना अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्यास आम्ही विरोध केला होता पण त्यांनी ती गोष्ट मानली नाही आणि आपल्या वडिलांवर खड्ड्यात पुरून अंत्यसंस्कार केले. जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून या मुलांवर कारवाई करण्याच्या दिशेने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.