सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार करभरणा केंद्र
पुणे -सलग दुसऱ्या वर्षी करोना संकटाच्या गंभीर लाटेचे सावट असतानाही पुणेकरांनी महापालिकेच्या तिजोरित विक्रमी करभरणा केला आहे. 1 एप्रिल ते 28 मे अखेर महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे सुमारे 585 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही रक्कम 269 कोटी रुपयांची होती.
त्यामुळे करोना संकटाशी दोनहात करताना उत्पन्नाचे स्रोत घटलेल्या महापालिकेस मिळकतकराच्या रुपाने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महापालिकेकडून 31 मे अखेरपर्यंत करभरणाऱ्या नागरिकांना कर सवलत दिली जात असल्याने शनिवारी तसेच रविवारी महापालिकेची करभरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
शहरात सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच करोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे शहरातील सर्व व्यवसाय बंद असल्याने महापालिकेचे उत्पन्नाचे इतर स्रोतांचे उत्पन्न लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, या संकटात महापालिकेस करोना नियंत्रणासाठी करावा लागणारा खर्च, पालिकेची आर्थिक तसेच शहर विकासावर उत्पन्न घटल्यास होणारा परिणाम लक्षात घेऊन मागील वर्षात पुणेकरांनी तब्बल 1600 कोटींचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत 31 मार्च 2021 अखेर जमा केला होता.
त्यामुळे महापालिकेनेही करदात्यांचे आभार मानत; 2021-22 या आर्थिक वर्षात मागील वर्षी ज्या निवासी मिळकतकरधारकांनी सप्टेंबर 2020 पूर्वी कर जमा केला त्यांना या वर्षात सरसकट 15 टक्के मिळकतकरात सवलत दिली आहे. त्यामुळे या सलवतीचा लाभ घेण्यासह शहराच्या विकासासाठी हातभार लावत पुणेकरांनी एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल 558 कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. यात 77 टक्के ऑनलाइन स्वरुपात, 12 टक्के रोख रकमेच्या स्वरुपात, तर 11 टक्के धनादेशाद्वारे जमा झाला असल्याचे करसंकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी सांगितले.
स्थायीकडून मुदतवाढ मिळणार…
महापालिकेकडून 31 मेपर्यंत सवलतीत कर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी स्थायी समितीत शहरातील लॉकडाऊनमुळे नागरिकांना कर भरण्यास मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. हे प्रस्ताव प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आले होते. त्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत जून 2021 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र, ही मुदतवाढ दिल्यास नागरिक 31 मे अखेरपर्यंत कर जमा करणार नाही असा समज करून घेत; मागील मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुदतवाढीचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला असून येत्या मंगळवारी त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.