पुणे – मार्केटयार्डातील फळे व भाजीपाला विभागात तीन व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. तसेच, परिसरात असलेल्या विविध संघटनांच्या कार्यालयाला भाडे आकारण्याचा निर्णयही जाहीर केला होता.
यास कामगार संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर आडते असोसिएशनशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हे निर्णय काहीकाळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.फळे व भाजीपाला विभागात काही लोक शेतमाल घेवून येणाऱ्या वाहनांकडून अनधिकृतपणे पैशांची वसुली करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी बाजार समितीने पार्किंगला जागा व वाहनांना सुरक्षा पुरवून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, बाजार परिसरात ज्या ज्या कामगार संघटनांची कार्यालये आहेत.
त्यांच्याकडून मासिक भाडे आकारण्याचाही निर्णय घेतला होता. कार्यालयाच्या भाड्यावरून कामगार संघटनांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच, लॉकडाऊनमुळे व्यापार घटला आहे. त्यामुळे करोनाकाळात या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे पत्र आडते असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला दिले होते. त्यामुळे दोन्ही निर्णय तात्पुरते स्थगित केले आहेत, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.