बीजिंग- तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा उत्तराधिकारी चीनच निवडेल अशी श्वेतपत्रिका चीनकडून काढण्यात आली आहे. दलाई लामा यांनी स्वत: त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केल्यास त्याला मान्यता नसेल असा दावाही या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.
चीनमधील सरकारच दलाई लामा आणि अन्य अध्यात्मिक बौद्ध नेत्यांची निवड करत मान्यता देते असा दावा चीनकडून करण्यात येतो आहे. दलाई लामा आता 85 वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडीची मागणी जोर धरू लागली आहे.
या मागणीनंतर चीनने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात अमेरिकेने उत्तराधिकारी निवडीत हस्तक्षेप केल्याने चीनची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळेच चीनने उत्तराधिकारी निवडीत ढवळाढवळ सुरु केली आहे. अमेरिकेने उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार दलाई लामा, तिबेटीय बौद्ध नेते आणि तिबेटमधील लोकांना असल्याचे म्हटले आहे.
यासाठी अमेरिकेन कॉंग्रेसने एक कायदाही लागू केला आहे. मात्र चीनने दलाई लामा निवडीची प्रक्रिया जुनी असल्याचे सांगत अमेरिकन पॉलिसीला विरोध केला आहे. तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेनुसार दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडला जाईल असे श्वेतपत्रिकेत सांगण्यात आले आहे. तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.