नागपूर – मानवापाठोपाठ आता प्राण्यांनाही करोनाचा धोका असल्याचे समोर येत आहे. काही प्राणी संग्रहालय आणि अभयारण्यांध्ये यासाठी प्राण्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कारण काही ठिकाणी प्राण्यांना करोनाची लागण झाल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता नागपूरच्या प्राणी संग्रहालयातही एका वाघीणीची करोना चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने ती चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:शवास टाकला आहे.
नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. याठिकाणी असलेल्या जान नावाच्या वाघीणीची तब्येत बिघडल्याच्या प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर जान या वाघीणीच्या नाकातून पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाने तातडीने तिचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
लगेचच या वाघीणीचे चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणी करण्यासाठी भोपाळ येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र ही चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना दिलासा मिळाला.