- 762 नवीन बाधित
- 58 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या आठवड्यापासून नवीन बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शहरात 1980 रुग्ण करोनामुक्त झाले. तर 762 नवीन बाधितांची भर पडली आहे. तसेच 58 रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी (दि. 19) शहरात 762 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 43 हजार 947 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 58 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 42 व शहराबाहेरील 16 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5707 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 1980 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 399 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 7218 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4758 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 15 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 773 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात 9 बाधित; एकाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात 9 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कासारसाई, सांगवी, आंबेगाव, पिंपळे सौदागर येथील रुग्णांचा बाधितामध्ये समावेश आहे. त्यामध्ये 4 पुरुष आणि 5 महिला रुग्ण आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान 32 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. वेल्हा-पानशेत येथील ते रहिवाशी आहेत. लोणी काळभोर, औंध, पाषाण, मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील 5 जण करोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 61 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 42 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 284 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 348 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 2 हजार 6 रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले आहे.