नवी दिल्ली – तीन वेळा आमदार राहिलेले आणि कॅबिनेटमंत्री दिवंगत जगत सिंह दायम यांच्या डॉक्टर मुलांच करोना रुग्णांची सेवा करताना निधन झालं. करोना महामारीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी मैदानात उतरून आयसीयुची जबाबदारी घेणाऱ्या डॉ. अमित दायमा यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ.अमित यांना करोनाची लागण झाली होती. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून करोनाविरुद्धच्या लढ्याबद्दल सांगितलं होतं.
मी एक डॉक्टर आहे. मी काही देव किंवा योद्धा नाही. पण जेव्हा मी आयसीयुमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते मला युद्धभूमी वाटायला लागतं. आम्हाला या व्हायरसरुपी बॉम्बपासून तुम्हाला आणि देशाला वाचवायचं आहे, असं म्हणत असतानाचा व्हिडीओ डॉ. अमित यांनी शेअर केला होता. मात्र तीन दिवसांनंतर दिल्लीतील दवाखान्यात ड्यूटीवर असताना डॉ. अमित यांच निधन झालं. त्यांनी म्हटलं होत की, डॉक्टराचे हाल समजून घ्या. मी मरतोय, पण मला शहिदाचा दर्जा मिळणार नाही. देशाने डॉक्टरांसाठी टाळ्या थाळ्या वाजविल्या त्यातही मी खूश आहे, असही डॉ. अमित यांनी म्हटलं होतं.
अमित यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ जो कोणी पाहतो त्याच्या डोळ्यात आश्रू येत आहेत. डॉ. अमित हे माजी केंद्रीयमंत्री जगत सिंह दायमा यांचे पुत्र आहेत. ४० वर्षीय अमित यांचं गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी पुरेसा आराम न करता पुन्हा ड्युटी जॉईन केली होती, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
डॉ. अमित यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं होत की, मलाही आई, मुलं आणि कुटंब आहे. आई तर अनेकदा भीतीपोटी म्हणते डॉक्टरकीची नोकरी सोडून दे. परंतु माझं कर्तव्य मला हे करू देत नाही. जेव्हा मी आयसीयुमध्ये असतो तेव्हा माझ्या कुटुंबालाही भीती वाटते. मात्र आम्ही डॉक्टर आपल्या कर्तव्यापासून हटू शकत नाही, असं डॉ. अमित यांनी म्हटलं होतं.
डॉ. अमित यांनी सर्व करोना योद्ध्यांना आदर आणि सन्मानजनक वागणूक देण्याची विनंती केली होती.