रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात एका आठवड्याचे लॉकडाऊन लावले होते. त्यानंतर कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी लॉकडाऊनला चांगले सहकार्य केले आहे. इंदापूर तालुक्यात मंगळवार ( दि. १८ ) पासून शासकीय नियम पाळून अनलॉक करण्यात येणार आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवार ( दि. १५ ) रोजी सकाळी ११ वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, प्रतापराव पाटील, अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भरणे बोलत होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आपली मोठी तयारी झाली आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट भयंकर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या लहान बालकांची काळजी घ्यावी. उगाच बाहेर फिरणे टाळावे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला धोका होवू शकतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
इंदापूर तालुक्यात १ ते १५ वर्षे वयोगटातील लहान मुलांची संख्या १ लाख ३ हजार असून, त्यांना लसीकरण करण्याबाबत आरोग्य प्रशासन विचार करत आहे. असे कोविड नियंत्रक प्रशांत महाजन यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जीवन माने व तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थिती होते.
आपल्या लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये पहायला कोणत्याही आईला आवडणार नाही
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपले पाहिजे असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. आपल्या घरातील लहान मुलांना बाहेर जावू देवू नये. आपल्यामुळे लहान मुलांना कोरोना झाला तर आपल्याला खुप वाईट वाटेल. कोणत्याही आईला आपल्या लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये पाहाणे आवडणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
- अंकिता मुकूंद शहा – नगराध्यक्षा, इंदापूर नगरपालिका, इंदापूर
पोलिसांनी गर्दी आणि नियम मोडणाऱ्यांकडे लक्ष द्यावे
बारामती तालुक्यात ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने नियोजन करून, कडक लॉकडाऊन ठेवले आहे, त्याप्रमाणे इंदापूर शहरात कडक लॉकडाऊन होताना दिसले नाही. आता मंगळवार पासून अनलॉक आपण करीत आहोत. मात्र पोलिसांनी यामध्ये अलर्ट राहायचे असून, नागरिकांची गर्दी अजिबात होवू द्यायची नाही, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांचे कान टोचले.