पुणे,दि.10 – अंधाराचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलास नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात न देता सोडून दिले होते. मात्र याच मुलाने रत येऊन पकडल्याचा राग मनात ठेवत एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना मुंढवा येथील केशवनगर येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुध्द कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन पवार(19,केशवनगर, मुंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री केशवनगर भागात लाईट गेल्याने अल्पवयीन मुलाने अंधाराचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला पकडून नागरिकांनी व फिर्यादी रोहन यांनी मारहाण केली होती. अल्पवयीन असल्याने पोलिसांत न देता त्याला सोडून दिले होते.
याचा राग मनात धरुन अल्पवयीन मुलगा काही वेळातच कोयता घेऊन पुन्हा आला. त्याने रोहन घराबाहेर उभा असता, त्याच्या पायावर कोयत्याने वार केले. रोहनची आई भांडणे सोडविण्यासाठी गेली असता, तीचे मंगळसूत्र गहाळ झाले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले करत आहेत.