- महामार्ग रस्ते सुनसान
- सर्व व्यवहार बंद
पिंपरी- करोनाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने शनिवारी (दि.10) शहर व उपनगरातील सर्व रस्ते सुनसान झाले होते. शहरातील सर्व दुकाने आणि आस्थापने बंद असल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला.
शुक्रवार ते सोमवार पर्यंत महापालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे मेडिकल दुकाने वगळता सर्वकाही बंद होते. एरव्ही गजबजलेले असणारे रस्ते, भाजी मंडई, बाजारापेठांमध्ये शुकशुकाट होता. काही ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली. शनिवारी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत दूध विक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. त्यानंतर मेडीकल आणि पार्सलसाठी हॉटेल्स आणि पेट्रोल पंपच उघडे होते. रस्त्यावर तुरळक वाहने व नागरिक दिसत होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाचे ठिकाणातील पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी मार्केट येथील शगुन चौक, साई चौक, चिंचवड स्टेशन चौक, जुना पुणे-मुंबई , पुणे-नाशिक व पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर तुरळक वाहने दिसत होती.
रुग्णालय परिसर गजबजलेलेच
शहरातील वाययीएम आणि महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांचा परिसर मात्र गजबजलेला दिसून आला. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना घरी पोहचविण्यासाठी बाहेर रिक्षा, कॅबची गर्दी होती. तसेच नातेवाईक डिस्चार्ज मिळालेल्या आपल्या आप्तेष्टांना घेण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे नवीन रुग्ण घेऊन येणाऱ्या ऍम्बुलेन्सची सातत्याने वर्दळ दिसून येत होती.