अहमदाबाद – केंद्र सरकारने गुजरातला सन 2018 च्या दुष्काळातली 3370 कोटी रूपयांची मदत नाकारल्याची माहिती गुजरात सरकारतर्फे आज विधीमंडळात देण्यात आली. गुजरात मध्ये 2020 साली आलेल्या पुराच्या संबंधात केंद्राकडे 7239 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे त्यालाही केंद्राकडून अजून प्रतिसाद देण्यात आलेला नाही असे राज्याचे महसुल मंत्री कौशिक पटेल यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.
सन 2018 साली आलेल्या दुष्काळी स्थितीबाबत शेतकरी व संबंधीतांना मदत करण्यासाठी गुजरात सरकारने केंद्राला 8 जानेवारी 2019 ला आर्थिक मदत मागणारे पत्र पाठवले. पण ती मदत आम्हाला केंद्राकडून मिळू शकली नाही असे मंत्र्यांनी सांगितले. सन 2018 साली गुजरात मधील 51 तालुक्यातील 3367 गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली होती.त्या आधारावर केंद्राकडे ही मदत मागण्यात आली होती. पण गुजरात हे राज्य मदतीच्या निकषात बसत नसल्याचे कारण देत केंद्राने ही मदत नाकारल्याचे महसुल मंत्र्यांनी सांगितले.
राज्याने पुरासाठी जी 7239 कोटी रूपयांची मदत मागितली आहे, त्यावरही अजून केंद्राने प्रतिसाद दिलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे. आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकार कडून सन 2018 ते 2020 या काळात 2660 कोटी रूपयांचा निधी गुजरातला दिला आहे अशी माहितीही संबंधीत मंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.