नवी दिल्ली – मागील एक वर्षापासून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या करोना संसर्गामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला प्रमाण गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू असताना रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. तर अनेक ठिकाणी लॉकडाऊनसह करोना काळातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र असं एक गाव आहे जिथे अद्याप करोना संसर्ग पोहोचू शकला नाही. विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या ३००० हून अधिक आहे.
मध्य कोलंबियातील बोयासा राज्यातली कँपोहेरमोसो काउंटीमध्ये अजूनपर्यंत एकही करोनाचा रुग्ण सापडलेला नाही. एकही रुग्ण सापडला नाही याचं मुख्य कारण म्हणजे येथील लोकांनी पाळलेली शिस्त होय. मध्य कोलंबियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
येथील लोकांनी नियम पाळावे यासाठी प्रशासनानी खूप प्रयत्न केले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याबाबत सतत अभियानं राबवून प्रशासन त्यांना जागरूक करतं. हे गाव पर्वतांनी वेढलेलं आहे त्यामुळे ते महत्त्वाच्या मोठ्या वाहतुकीच्या रस्त्यांपासून खूप दूर आहे. गावात केवळ सात रस्ते आणि सहा चौक आहेत. हिरवळीने नटलेल्या एका 3300 फूट खोल दरीच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे.
दरम्यान कोलंबियाची लोकसंख्या 5 कोटी असून त्यापैकी 23 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र तरी देखील कँपोहेरमोसो काउंटी करोनापासून अलिप्त आहे. गावातल्या पथदिव्यांना लावलेल्या स्पीकर्सवरून दिवसांतून तीनवेळा करोना विषाणूला दूर ठेवणं आणि घ्यावयाची काळजी याच्या सूचना देण्यात येतात. ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना 1000 रेडिओ सेट वाटले असून विविध रेडिओ कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत जनजागृती करण्यात येते.