- 35 मिळकती सील
- 3 कोटी 34 लाख रुपयांचा थकीत कर वसूल
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मिळकतधारकांची थकबाकी आहे, त्यांच्यावर महापालिका जप्तीची कारवाई करत आहे. शहरातील 325 मिळकतधारकांना कर थकविल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर न भरलेल्या तब्बल 35 मिळकतींवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे.
शहरातील 118 बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटीस बजावल्या आहेत. अंतिम नोटीसद्वारे थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. आतापर्यंत 520 कोटी रुपये मालमत्ताकर जमा झाला आहे. तर नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये 35 मिळकती सील करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मिश्र, निवासी, बिगरनिवासी मिळकतींचा समावेश आहे. यामध्ये शहरातील बड्या संस्थांचा समावेश आहे. गुलशन हॉटेल, जयवंत इन्स्टीट्यूट ऑफ कॅम्प्यूटर ऍप्लिकेशन, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे होस्टेल व स्टाफ क्वॉर्टर, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये काही बिल्डरांचेही कार्यालय सील करण्यात आले आहे. त्यामध्ये बसवंत बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स यांचा समावेश आहे. त्यांनी कराचा भरणा केला नसल्याने त्यांची मिळकत सील करण्यात आली आहे.
या सर्व 35 मिळकतींचे अवैध बांधकाम शास्ती रक्कम धरून 17 कोटी 95 लाख रुपये थकीत रक्कम आहे. त्यापैकी 3 कोटी 34 लाख 43 हजार 931 रुपये वसूल करण्यात आले आहेत.