नवी दिल्ली – भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज राज्यसभेमध्ये बोलताना कॉंग्रेसला महाराष्ट्रातील 100 कोटी वसुलीच्या प्रकरणावरुन टोला लगावला. शिंदे आर्थिक विधेयकासंदर्भात आपलं मत मांडत असताना कॉंग्रेसचे खासदार गोंधळ घालू लागले. यावर त्यांनी, मला तोंड उघडायला लावू नका. पब आणि रेस्तरॉंमधून 100 कोटींची वसुली केली जातेय आणि ती सुद्धा थेट गृहमंत्र्यांकडून, असं म्हणत कॉंग्रेस खासदारांना इशारा दिला.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसच्या काही खासदारांनी पेट्रोल-डीझेलच्या किंमतींवरुन आरडाओरड सुरु करत त्यांच्या भाषणामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना त्यांनी, ‘इंधनाचे दर वाढले आहेत हे जरी सत्य असलं तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यालाही मर्यादा असते असं म्हणत इंधनदर वाढीचे गणित विरोधी पक्षाला समजावून सांगितलं. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील खर्च वजा केल्यानंतर राज्यांना 40 टक्के तर केंद्राला 60 टक्के पैसे मिळतात. त्या 60 टक्क्यांपैकीही 42 टक्के केंद्राकडून राज्यांना परत जातात. त्यामुळे राज्यांना एकूण 64 टक्क्यांपर्यंत पैसे मिळतात तर केंद्राकडे केवळ 36 टक्के असतात,’ असं स्पष्टीकरण दिलं.
महाराष्ट्रातील इंधनाच्या दरांवरुन कॉंग्रेसला सुनावलं
‘महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. इथे तुम्ही सरकारला सांगत आहात मात्र तिकडे (महाराष्ट्रात) तुम्ही यासंदर्भात काहीच करत नाहीत. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की ज्यांची स्वत:ची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत, ‘असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी कॉंग्रेसच्या खासदारांना खडे बोल सुनावले.