सातारा – केवळ आठ तास शिकवणे आणि तासाची घंटा वाजताच खडू-डस्टर घेऊन वर्ग सोडणे अशा भूमिकेत काही शिक्षक कधीच नसतात. वेगवेगळ्या कल्पना वापरुन विद्यार्थ्यांना एखादा विषय समजावून कसा सांगता येऊ शकेल, याचा विचार अनेकदा अनेक शिक्षक करत असतात. शिवाय निरुपयोगी वस्तू वापरुनही ते अशी काही शैक्षणिक साधने बनवतात, की पाहणाऱ्याने थक्कच व्हावे.
वाई येथील द्रविड हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश मोने हे असेच प्रयोगशील आणि कल्पक शिक्षक. शाळेच्या आवारात एक वठलेले झाड त्यांना दिसले. सहसा वठलेले झाड म्हणजे, लाकूडतोड्याला बोलावून ते कापून टाकायचे अथवा वखारीत पाठवायचे. मात्र मोने सरांनी असे न करता, या वठलेल्या झाडाच्या खोडाला शिसपेन्सिलसारखा आकार दिला आणि त्यानुसार रंगरंगोटीही करुन घेतली. ही पेन्सिल सध्या सर्वांचेच लक्ष आकर्षून घेत आहे. तसेच या लाकडी शिल्पाचे छायाचित्रही सोशल मिडीयातून व्हायरल होत आहे.
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाची खूण असलेली ही पेन्सिल सर्वांना प्रेरणादायी ठरतेच. परंतु एका वठलेल्या झाडातून तिची सुंदर प्रतिकृती तयार होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल. कारण एरवी वठलेले झाड म्हटले की ते तोडायचे आणि त्याचा वापर चुलीसाठी, बंब पेटविण्यासाठी करायचा एवढेच माहीत. परंतु द्रविड हायस्कूल नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबवित असते.
शाळेच्या आवारात असलेले हे झाड तोडून टाकण्यापेक्षा त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे काही तरी घडविण्याची कल्पना नागेश मोने यांना आली आणि त्यातूनच ही पेन्सिलची सुंदर प्रतिकृती उदयास आली. ही पेन्सिलची प्रतिकृती शाळेच्या आवारात शोभून दिसत आहे