मुंबई, – जगभरातील विविध देशांचे “स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणाऱ्या “फ्रीडम हाऊस; या अमेरिकेतील संस्थेने त्यांच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा विकृत नकाशा दाखवला आहे. या नकाशातून काश्मीर प्रदेश, अक्साई चीन हे भूभाग भारतात दाखवलेले नाहीत, तसेच अंदमान-निकोबार आणि लक्षद्विप बेटेच दाखवलेलीच नाहीत.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तरी देखील ‘फ्रीडम हाऊस’ने काश्मीरला “पाकिस्तानी काश्मीर’ असे संबोधले आहे, तर अक्साई चीन हा भूभाग चीनच्या नकाशामध्ये दाखवला आहे. हे भारताच्या नकाशाचे विकृतीकरणच असून हा भारताचा अपमान आहे. या प्रकरणी भारत सरकारने या संस्थेशी पत्रव्यवहार करून त्यांना चुकीचा भारताचा नकाशा काढून आणि योग्य नकाशा प्रकाशित करण्याविषयी सूचना करावी. अन्यथा या संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
समितीने याविषयी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री, तसेच भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे.