पुणे : महापालिकेस दररोज सुमारे 12 हजार करोना लस आवश्यक असून पालिकेकडे केवळ 23 हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे, महापालिकेस राज्यशासनाकडून लस येण्यास तीन ते चार दिवस लागणार आहेत. परिणामी पुणे महापालिकेस पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील 15 हजार लस तातडीनं देण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मध्यस्थी केली असून दोन्ही महापालिकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेने शासनाकडे 3 लाख डोसची मागणी नोंदविली असून येत्या शनिवार पर्यंत 90 हजार डोस मिळणे अपेक्षीत आहेत.
शहरात 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांचे करोना लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रासह, पालिकेने शहरात खासगी हॉस्पीटलमध्येही लसीकरण सुरू केले आहे. त्यात, प्रामुख्याने शहरातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या रूग्णांना ही लस देण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या दहा दिवसातच महापालिकेकडे असलेल्या लस संपत आल्या आहेत,
दरम्यान, पालिकेकडे केवळ 23 हजार लस शिल्लक असून त्या दोन दिवस पुरतील एवढयाच आहेत. त्यामुळे, लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बुधवारी सकाळी विभागीय आयुक्तांकडे झालेल्या करोना आढावा बैठकीत महापालिकेकडून शहरासाठी तातडीनं लस मिळावी अन्यथा लसीकरण मोहीमेवर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. त्याला तत्काळ प्रतिसाद देत विभागीय आयुक्तांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुणे महापालिकेस 15 हजार लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर राज्यशासनाकडून शनिवार पर्यंत महापालिकेस आणखी 90 हजार डोस मिळणार असून हे डोस मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेस हे 15 हजार डोस परत केले जाणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.