मेलबर्न – यंदाच्या मोसमातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसरा क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रियाचा डोमिनिक थिएम अस्वस्थतेचा बळी ठरला आहे. जागतिक क्रमवारीत 21व्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने उपउपांत्यपूर्व फेरीत सलग सेटमध्ये त्याचा 6-4, 6-4, 6-0 असा पराभव केला.
दुसरीकडे महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने तेराव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चौथ्या फेरीत तिने जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकाच्या बेलारूसच्या अरेना साबलेन्काचा पराभव केला.
दिमित्रोव्हने थिमचा पराभव करत चौथ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. थिएमने 2020 मध्ये यूएस ओपन जिंकला होता. तसेच गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपदावर नाव कोरले होते. दिमित्रोव्हने 18, तर थिएमने 41 चुका केल्या.
उपांत्यपूर्व फेरीच्या दिमित्रोव्हचा सामना रशियाच्या असलान कारात्सेव याच्याशी होणार आहे. कारात्सेवने चौथ्या फेरीत कॅनडाच्या फेलिक्स एगुर एलियासिमचा पराभव केला. 3 तास 25 मिनिटांपर्यत रंगलेल्या या सामन्यात कारात्सेवने फेलिक्सला 3-6, 1-6, 6-3, 6-3, 6-4ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिला एकेरीत सेरेनाने प्री-क्वार्टर फायनल सामन्यात साबालेंकाचा 6-4, 2-6, 6-4 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर साबालेंकाने दुसऱ्या सेटमध्ये वापसी करत सेट जिंकला. यानंतर सेरेनाने तिसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करत सेटसह सामना जिंकला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकानेही उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्या फेरीत तिने दोन वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन गार्बिन मुगुरुझाचा 4-6, 6-4, 7-5 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपनमधील मागील तीन वर्षांत हा तिचा दुसरा उपांत्यपूर्व सामना असेल. पुढील फेरीत तिची लढत सिया सु-वेई हिच्याशी होणार आहे.