पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना करोनाचे लसीकरण करण्यास मंगळवार (दि. 9) सुरुवात झाली. पहिली लस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली तर दुसरी लस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घेतली.
सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तीन हजार 100 पेक्षा अधिक पोलीस कार्यरत आहेत. त्या सर्वांचे लसीकरण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये करून घेतले जाणार आहे.
चिंचवड येथील आयुक्तालय कार्यालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून शहर पोलीस दलातील सर्व पोलिसांना लस दिली जाणार आहे. सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याचे पोलीस चिंचवड येथे येतील आणि लस घेतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
करोना काळात शहरातील पाचशेहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली. त्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला. वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जानेवारीच्या सुरुवातीपासून करोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आता पोलिसांना देखील लस दिली जात आहे. शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे.