मुंबई – आंदोलनजीवी अशा पध्दतीने शेतकऱ्यांना हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान – सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच झुकतो,असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.
पुढे मंत्री भुजबळ म्हणाले की, आंदोलने ही देशभर नव्हे तर जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचं,कुठे बांगड्या घेऊन जा,कुठे रिकामे हंडे घेऊन जा,रस्त्यातच बसणे इत्यादी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने त्यांनी केली.
आम्ही तर सभागृहातसुद्धा आंदोलने केली. लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर त्याविरोधात पत्र पाठवणे, निषेध करणे आणि आंदोलने करणे, हे होत असते. अशा गोष्टींना हिणवणे योग्य नाही. आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झाले तर त्याचा काटा भाजपाकडेच झुकतो, असं देखील भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात आभार प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होत आहे आणि आंदोलनजीवी शब्दावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.